वस्त्रवलय!

Vastravalay | OkThen

संकट एखाद्या माणसाचं जगणं मुश्कील करतं तर एखाद्याला आयुष्याची नवी दिशा दाखवतं. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे हाल झाले, अनेकांचे जॉब गेले, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला.. पण याच लॉकडाऊनची दुसरी बाजू म्हणजे अनेकांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सुरुवात केली. यातलं एक नाव म्हणजे ‘वस्त्रवलय!’

काळ हा सतत बदलत असतो. त्या काळाच्या ओघात आपण अनेक गोष्टी नकळतपणे मागे सोडतो आणि नवनव्या गोष्टी आत्मसात करतो. या काळाच्या प्रवाहात वैभवी झोरे हिने जुन्या आणि नव्या गोष्टींचे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली. पारंपारिकतेला नव्याचा टच देऊन एक नवीन व्यवसाय उभा केला.. तो म्हणजे पारंपरिकता आणि नावीन्याचा संगम असलेला वस्त्रवलय हा ब्रँड!

व्यवसायाच्या पार्श्वभूमी बाबत विचारल्यावर वैभवी म्हणाली की, ‘पुढे जाऊन व्यवसाय करायचाय असा विचार अकरावीला असल्यापासूनच मनात होता. पण याची तीव्र जाणीव मला माझ्या मित्र- मैत्रिणींमुळे झाली. कॉलेजमध्ये असताना फॅशन शोच्या आऊटफिट्स डिझाइन करण्यासाठी मला अनेकांनी प्रोत्साहन दिलं, सहाय्य केलं आणि माझी ही आवड व्यवसायात बदलली.’

बाजारात असे पारंपारिक बरेच ब्रँड असले तरी त्यांचे दर काहीसे जास्त असतात. सामान्यांना अफोर्डेबल वाटतील अशा दरात तिने अप्रतिम डिझायनिंग करायला सुरुवात केली. आज तिच्या हटके कपड्यांना परदेशातही मागणी आहे. लॉकडाऊन मुळे डिलीव्हरी करण्यास व्यत्यय येत असला तरीही लोकांच्या ऑर्डर थांबत नाहीयेत आणि हा आलेख नेहमी चढता रहावा, हीच सदिच्छा.

इतक्या लहान वयात एखादा बिजनेस सुरु करून त्यात सातत्य ठेवणं बरंच कठीण असतं. वैभवीलाही बिझनेस सुरू करताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. ब्रँडचे नाव आणि लोगो रजिस्टर करणं, आपलं बिझनेस मॉडेल चोरलं जाऊ नये यासाठी वकील हायर करणं, प्रत्येक डिझाईन रजिस्टर करणं, सहज उपलब्ध नसलेलं चांगल्या दर्जाचं खणाचं कापड शोधणं अशा अनेक लहानसहान अडचणी आल्या. परंतु यशस्वी उद्योजकतेच्या दृष्टीने पावलं टाकत वैभवीने त्या हलकेच दूर केल्या.

आई आणि आजीच्या साड्या, बाबांचे शर्ट पीस यात डिझाईन पाहणाऱ्या आणि त्या प्रत्यक्षात उतरवणार्‍या वैभवी झोरे हिच्या वस्त्रवलयची दखल चक्क आकाशवाणी आणि महाराष्ट्र टाइम्सनेही घेतली.

वैभवीला भविष्यात स्वतःचे ब्युटीक सुरू करायचे आहे आणि वस्त्रवलय या ब्रॅण्डला आणखी दिमाखात उभे करायचे आहे. त्यासाठी तिला OkThen कडून भरभरून प्रेम !!

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *