केवळ २५०० रुपयांत सुरू झालेल्या ड्रायफ्रूट व्यवसायाची परदेशवारी!

Susmita Dryfruit Basket | OkThen

“आधी वकील मग गृहिणी, शिक्षिका ते बिझनेस वुमन हा थक्क करणारा प्रवास कसा घडत गेला हे मागे वळून पाहताना अचानक आठवते आणि तो पूर्ण प्रवास डोळ्यासमोरून तरळून जातो.” सुस्मिता ड्रायफ्रूट बास्केटच्या सर्वेसर्वा सौ. सुस्मिता दाते सातपुते यांचे हे बोल ऐकताना त्यांचा प्रवास जाणून घ्यावेसे प्रकर्षाने वाटू लागले आणि OkThen च्या Entrepreneur of The Week मालिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला म्हणून त्यांची निवड निश्चित झाली!

सुस्मिता ड्रायफ्रुट बास्केट कसं घडलं हे त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया…

‘आई म्हटलं की मुलांच्या तब्येती बाबतीत जरा जास्तच काळजी घेते. त्या मुलांच्या आहारात सगळ्यात आधी येतात ते ड्रायफ्रुट्स. त्याचप्रमाणे मी देखील दर महिन्याला ड्रायफ्रूट घ्यायचे. आमच्या आसपास ड्रायफ्रूट्सची काही मोजकी दुकानं होती आणि जर चांगली क्वालिटी हवी असेल तर ड्रायफ्रूट्सचे भाव देखील जास्त द्यावे लागत. ड्रायफ्रुट्सचा आहार हा फक्त लहान मुलांसाठीच नाही तर प्रेग्नेंट महिला आणि वयस्कर लोकांसाठीही महत्त्वाचा आहे. पण प्रत्येक वेळी त्यांना उठून स्वतःहून दुकानात जाता येत नाही. हे सगळं पाहताना १ डिसेंबर २०१९ या दिवशी मनात विचार आला की आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. दुकान वगैरे घेण्यात खर्च न करता आपण होम डिलिव्हरी देऊन पाहू!’

‘माहेरी कधीच कोणी व्यवसाय केला नाही, त्यामुळे रक्तात हे गुण नव्हतेच. मात्र नवर्‍याचा भक्कम पाठिंबा होता. एक दिवस आम्ही दोघांनीही बाजारहाट केली आणि २५०० रुपयांचा ड्रायफ्रूट्स माल घरी घेऊन आलो. आता हा माल विकला नाही गेला तर घरातही वापरता येण्यासारखा होता. बॅकअप प्लॅन रेडी! मग एका पेपर वर रेट लिस्ट बनवली आणि व्हाट्सअप वर फॉरवर्ड केली… असा झाला श्रीगणेशा!’

‘आता व्यवसायाचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न समोर होता. मग माझ्या मिस्टरांनी असं सुचवलं की तुझा मित्रपरिवार फार मोठा आहे, त्यामुळे तुझी ओळखही जास्त आहे.. मग तुझंच नाव देऊ! अशा प्रकारे सुस्मिता ड्रायफ्रूट्स बास्केटचा जन्म झाला.’

‘२५०० चा माल चक्क एका तासात बुक झाला! त्यामुळे परत बाजारात जावे लागले. मग मिस्टरांच्या दर सुट्टीला आमची बाजारहाट सुरू झाली.’

‘डिसेंबर मध्ये व्यवसाय सुरू केला. तेव्हा मी ड्रायफ्रूट्च्या मागणीनुसार पॅकेजेस विकत होते. जानेवारीमध्ये महिलांचे हळदी-कुंकू असते. तेव्हा डोक्यात एक कल्पना आली आणि हळदीकुंकू मिनी पॅक्सची या नव्या प्रॉडक्टची सुरुवात झाली. या कल्पनेने बरीच उंच भरारी घेतली. ५०० हून अधिक मिनी पॅक्सची विक्री झाली. तेवढ्या घरात आम्ही पोहोचलो आणि पॅकेजिंगमुळे जाहिरातही झाली. मग फेब्रुवारीमध्ये ड्रायफ्रूट थंडाई बनवली! तिलाही मस्त रिस्पॉन्स मिळाला. यावर्षी तर थंडाईला परदेशात मागणी आली! बासुंदी मिक्स, रबडी मिक्स हे सुस्मिता ड्रायफ्रुट बास्केटचे प्रॉडक्ट परदेशी पोहोचले सुद्धा! आजतागायत असे एकही प्रॉडक्ट नाही ज्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही.’

‘चहा मसाला, दूध मसाला, लाडू प्रिमिक्स, फ्लेवर्ड काजू असे सगळे प्रॉडक्ट गाजले. हे सगळं शक्य झालं ते अनेक मित्रमैत्रिणींच्या, आईबाबांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे! आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली व्हॉट्सअप आणि फेसबुकने. सुस्मिता ड्रायफ्रुट बास्केटचे सोशल मीडिया पेज नसूनही पर्सनल प्रोफाइलच्या माध्यमातून मी कमीत कमी खर्चात जाहिराती करण्याचा प्रयत्न केला.’

‘सुस्मिता ड्रायफ्रूट बास्केटचे रिब्रँडिंग करण्याचे काम सोनल सुर्वे हिने केले. तिने जाहिराती करण्यासाठी मार्गदर्शन केले, लोगोपासून ते आमच्या सगळ्या प्रॉडक्टच्या जाहिराती बनवत सुस्मिता ड्रायफूड बास्केटचा मेकओव्हर केला.’

‘सध्या लॉकडाऊन मुळे व्यवसायाची गती थोडी मंदावली असली, तरी आज आम्ही कुठेतरी स्वतःचे स्थान मिळवतो आहे याचा आम्हाला अभिमान आहे!’

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *