डिसेंबरच्या शेवटी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात नववर्षासाठी आवर्जून विकत घेतली जाणारी गोष्ट म्हणजे कालनिर्णय. २०१७ यावर्षी कालनिर्णयच्या नऊ भाषांतील १८ लाख २० हजार प्रती विकल्या गेल्या, ही आश्चर्याची गोष्ट नाही का?
आज इंटरनेटच्या जमान्यातही कालनिर्णयचा खप काही थांबत नाही. एकेकाळच्या मोठ-मोठ्या कंपन्या आज बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी धडपड करत असताना कालनिर्णयने ही गोष्ट अगदी सहज कशी साधली, हे जाणून घेऊया आजच्या लेखातून.
चला तर फेरफटका मारूया कालनिर्णयच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये. फार पूर्वीपासून भारतीयांचं पंचांगाशी फार घट्ट नातं. कोणतीही गोष्ट करण्याआधी पंचांग मुहूर्त पाहणं ही भारतीयांची परंपराच जणू.
परंतु ज्योतिषी श्री जयंतराव साळगावकर यांनी तब्बल ४० वर्षांपूर्वी सामान्य माणसांची ही गरज ओळखली आणि मुंबईतील एका छोट्याशा खोलीत जगभरातील एका मोठ्या पब्लिकेशनची स्थापना केली. सामान्यांना पंचांगातील वर्षभराच्या सगळ्या गोष्टी इंग्रजी महिन्यांसोबत जोडून अगदी सोप्या स्थानिक भाषेत मांडून देणे हा कालनिर्णयचा उद्देश.
१९७३ साली कालनिर्णयच्या पहिल्या १०००० प्रती छापून साळगावकरांनी त्यांच्या नव्या कल्पनेचा श्रीगणेशा केला. पंचांगासारखेच मुहूर्त पाहत ‘वेळेत निर्णय घेण्यासाठी’ ही संकल्पना सुरू केल्यामुळे साळगावकरांनी तिचे नाव ‘कालनिर्णय’ ठेवले.
साळगावकरांनी साऱ्या प्रती घरोघरी जाऊन विकल्या. तेव्हा कॅलेंडरची किंमत होती सव्वा रुपया! १९७३ च्या वर्षात तब्बल पंचवीस हजार कॅलेंडर विकले गेले.
या काळात कॅलेंडर लोकांना भेटवस्तू देण्यासाठी वापरले जायचे. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात दुकानदार, कंपनी, बँका इत्यादी ठिकाणी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या आकाराचे कॅलेंडर भेटवस्तू म्हणून देण्यात यायचे. म्हणजेच तेव्हा कॅलेंडर हे ‘वस्तू म्हणून विकत घेतले जायचे नाही‘.
लोकांना कॅलेंडर मधून काहीतरी अधिक मिळावे, त्यांना यातून मूल्यवान गोष्टी जाणून घेता याव्यात, सोबतीला त्यांचे मनोरंजन व्हावे आणि त्यांनी कॅलेंडर स्वतःहून विकत घ्यावे यासाठी साळगावकरांनी गृहिणींना लक्ष्य केले.
तेव्हापासून कॅलेंडर हे फक्त तारीख-वार-तिथी यांसाठी नसून ते पाककृती, घरचा वैद्य, लघुकथा, कोडी, राशिभविष्य, योगाभ्यास अशा अनेक गोष्टींचा वार्षिक अंक बनले आणि दैनंदिन जीवनाचा भागही बनले!
आज इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि कन्नड अशा नऊ भाषांत कालनिर्णय उपलब्ध आहेत. परदेशी भारतीयांना भारताच्या संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी कालनिर्णयची इंग्लंड आणि अमेरिका या देशांसाठी विशेष आवृत्ती छापली जाते. आज हिंदुस्तान युनिलिव्हर पासून गोदरेज पर्यंत अनेक कंपन्या कालनिर्णय कॅलेंडरवर आपल्या जाहिराती देत असतात.
कालनिर्णयने बदलत्या बाजारपेठेशी जुळवून घेत स्वतःमध्ये खूप बदल केले. बाजारपेठेतील विविध गरजा असणाऱ्या ग्राहकांना ओळखत ‘किसान कालनिर्णय‘ नावाचे भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी माहितीपर कालनिर्णय सुरू झाले.
आज कालनिर्णयला स्पर्धा देणारे दहा ब्रँड तरी बाजारात असतील, तरीही ते कालनिर्णयची जागा घेऊ शकले नाहीत. १९९६ साली कालनिर्णयने स्वतःची वेबसाईट सुरू केली. त्यानंतर त्यांनी इ-कालनिर्णय, ॲप सुरू करत नव्या पिढीलाही कालनिर्णय वापरण्यास प्रोत्साहन दिले.
बदलत्या गरजा आणि बदलते तंत्रज्ञान समजून घेत कालनिर्णयने नेहमी अचूक निर्णय घेतले. आज इतक्या वर्षांनीही विविध संस्कृतींचे जतन करणारं कालनिर्णय घराघरातल्या भिंतींवर राज्य करत आहे.